छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची रॅली; ‘स्वप्नपूर्ती’ मोर्चा पोलिसांनी अडवला
छत्रपती संभाजीनगर,१६ मार्च / प्रतिनिधी :- आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ ‘स्वप्नपूर्ती’ मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी एमआयएमने नामांतराला विरोध करत रॅली काढली होती, त्याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. दरम्यान, हा मोर्चा ग्रामदैवत असलेल्या श्री. संस्थान गणपती इथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार होता. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला.

काही दिवासांपूर्वी राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे नामांतर करत छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्याचा निर्णय घेतला. याविरोधात एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनातून छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करण्यात आला. या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मनसेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले. मात्र पोलिसांच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या रॅलीला पोलिसांच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली आहे. फौजदार प्रक्रिया संहिता कलम 149 नुसार देण्यात आलेल्या नोटीसीद्वारे ही परवानगी नाकारण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांना पोलिसांनी पाठवले असून, त्यात कायदा सुव्यवस्थेचे नुकसान झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसारच हा मोर्चा पोलिसांनी अडवला.
भूमिकेवर होते ठाम
पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी हा मोर्चा आपण काढणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे होते. त्यासाठी संस्थान गणपती परिसरात जय्यत तयारी करण्यात आली. तसेच जालना येथूनही मनसेचे अनेक कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी जालना येथून निघताना रेल्वेवर छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर देखील लावले होते. मात्र, विभागीय आयुक्तालयावर पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडवला.