शाळकरी मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस २० वर्षाची शिक्षा ; वैजापूर कोर्टाचा निकाल

वैजापूर ,१५ मार्च / प्रतिनिधी :- किराणा दुकानात नेहमी सामान घेण्यासाठी येणाऱ्या 13 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षाची सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्दीन एम.ए. यांनी बुधवारी (ता.15) सुनावली. 

लोणी (ता. वैजापूर) येथील 13 वर्षीय पीडिता मुलगी ही किराणा सामान ​ घेण्यासाठी गावातील जमीर शेख याच्या दुकानात जात असे. जमीर याच्याशी तिची ओळख झाली.तू मला फार आवडते..माझे तुझ्यावर प्रेम आहे.असे जमीर तिला सांगत असे.11 मे 2021 रोजी रात्री पीडित मुलगी, आई, वडील व काका यांनी सोबत जेवण केले. त्यानंतर रात्री आरोपी जमीर याने  पीडित मुलीला रात्री बारा वाजेच्या सुमारास मोबाईल फोन करून तू आत्ताच भेटायला ये आली नाही तर तुला व तुझ्या आईवडिलांना जीवे ठार मारील असे म्हणाला.पीडिता मुलगी ही घाबरली व न सांगता ती घरातून आरोपी जमीर शेख याला भेटायला गेली. आरोपी जमीर याने तिला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर बलात्कार केला.

जमीर शेख

या प्रकरणी पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी आरोपीविरुध्द बाल लैंगिक अत्याचार कायद्यानव्ये गुन्हा दाखल केला. तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

वैजापूर सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. सात साक्षीदार तपासण्यात आले.साक्षी पुराव्यानुसार जमीर याने गुन्हा केल्याचे न्यायालयासमोर सिध्द झाले. साक्षी पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहियोद्दीन एम.ए. यांनी आरोपी जमीर शेख यास दोषी ठरवून 20 वर्षाची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अँड. नानासाहेब शिवाजीराव जगताप यांनी काम पाहिले.त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती व पैरवी अधिकारी व्ही.ए.जाधव यांनी सहकार्य केले.