वैजापूर तालुक्यात दोन हजार सरकारी कर्मचारी संपावर

वैजापूर ,१४ मार्च / प्रतिनिधी :- जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी वैजापुरातील विविध सरकारी विभागाच्या जवळपास दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संपाचे हत्यार उगारले. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा देत पंचायत समिती, नगरपालिका, तहसिल कार्यालय, आरोग्य विभाग यासह सर्व निमशासकीय कर्मचारी संघटनेने या संपात सहभाग नोंदवल्याने शासकिय कार्यालयातील कामकाज पुर्णपणे ठप्प झाल्याचे दिसुन आले. त्यामुळे ग्रामीण भागातुन कामासाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले.‌

सहायक गटविकास अधिकारी अमेय पवार , कृषि अधिकारी एच.आर.बोयनर यांच्यासह शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब जगताप, किशोर कदम, दत्तात्रय गायकवाड, अनिल जगदाळे, विशाल तांबे, अनिल नाईकवाडी, रवि अनर्थे, संतोष सोनवणे, गणेश रोठे, एन.आर.साळुंके, अंजुम पठाण, संतोष बरबडे, शिवाजी डुकरे, विलास त्रिभुवन, संजय गायकवाड, मोईन, आदींनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत निदर्शने केली व फलक दाखवुन घोषणा दिल्या.‌ तालुका पेंशनर संघटनेचे अध्यक्ष धोंडिरामसिंह राजपूत, बबन क्षिरसागर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भागवत बिघोत यांची भेट घेऊन निवेदन दिलेव संपास पाठिंबा दर्शवला.‌ नगरपालिकेच्या 19 शाळांमधील शिक्षक या संपात सहभागी झाले आहेत.‌ वकिल संघटनेनेही या संपास आपला पाठिंबा दर्शवला.