भारतातील बरे होणाऱ्या कोवीड-19 रूग्णसंख्येने 32.5 लाखाचा टप्पा ओलांडला

भारतात आजपर्यंत सुमारे 5 कोटी कोविड चाचण्या

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2020

भारतात कोवीड 19 रूग्ण बरे होण्याचा चढता आलेख कायम असून बरे झालेल्या रूग्णसंख्येने आज 32.5 लाखाचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासांत 69,564 रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे रूग्णांचा बरे होण्याचा दर 77.31% इतका झाला आहे.

वेगवान आणि व्यापक तपासणी करत टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट अर्थात तपासणी, पाठपुरावा आणि उपचार अशा त्रिसुत्रीच्या माध्यमातून प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांच्या तपासणीवर आणि उपचारावर भर दिला जात आहे. रूग्णांची तब्येत बिघडण्यापूर्वी त्यांना वेळेवर रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची तत्पर सेवा आणि प्रत्येक टप्प्यावरील सुव्यवस्थापनामुळे कोविड -19 बाधीत रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यामुळे मृत्यूदरातही घट होऊन तो 1.70% पर्यंत कमी झाला आहे. घरे आणि सुविधा केंद्रांमध्ये देखरेखीखाली विलगीकरण, तसेच खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब केल्यामुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असणारे रूग्ण लवकर बरे होऊ शकले आहेत.

देशातील एकूण रूग्णांपैकी 60% रूग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 21.6%, आंध्र प्रदेशमध्ये 11.8%, तमीळनाडूमध्ये 11.0%, कर्नाटकमध्ये  9.5% तर उत्तर प्रदेशमध्ये  6.3% रूग्ण आहेत.  देशातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 26.76% रूग्ण महाराष्ट्रातले आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये 11.30%, कर्नाटकमध्ये 11.25%, उत्तर प्रदेशमध्ये 6.98% आणि तामीळनाडूमध्ये 5.83% सक्रिय रूग्ण आहेत.  देशातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 62% रूग्ण या पाच राज्यांमध्ये आहेत.

आज दिवसभरात एकूण 32.5 लाख पेक्षा जास्त (32,50,429) रूग्ण बरे झाले आहेत.आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासांत सर्वात जास्त 11,915 रूग्ण बरे झाले आहेत.कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनुक्रमे 9575 आणि 7826 तर तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये अनुक्रमे 5820 आणि 4779 रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24  तासांत या 5 राज्यांमधले एकूण 57% रूग्ण बरे झाले आहेत.

भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता 11.70 लाखांच्या पुढे गेली आहे.

भारतात आजवर झालेल्या एकूण चाचण्यांचा आकडा सुमारे पाच कोटी (4,95,51,507) इतका आहे . गेल्या 24 तासात देशात  7,20,362  चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात चाचण्यांची गती आणि व्याप्ती वाढवल्यामुळे, केवळ गेल्या दोन आठवड्यात 1,33,33,904 चाचण्या करण्यात आल्या

व्यापक जागतिक संदर्भाच्या अनुषंगाने, केंद्रसरकारची धोरणे देखील सातत्याने सुधारली आत आहेत. जनतेला दिलासा देण्याच्या अनेक उपाययोजनांपैकी, एक म्हणजे देशात सर्व लोकांना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अलीकडेच, आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करुन पहिल्यांदाच, ‘मागणीनुसार चाचणी’सुविधा देऊ केली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनाही अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी नियमांमध्ये बरीच लवचिकता आणि स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

दररोज चाचण्या करण्याचा वेग सातत्याने वाढता असून, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून दररोज सात लाखांपर्यंत होणाऱ्या चाचण्यांची संख्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतिदिन/दहा लाख चाचण्या झाली आहे. 

अधिक चाचण्या केल्यामुळे कोविडचे रुग्ण लवकर ओळखता येत असून, त्यांच्यावर आणि विलगीकरण/ अथवा रुग्णायालात भरती करुन लवकरच उपचार सुरु करता येतात. या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे होण्याचे आणि मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण वाढत असून आपण अनेक लोकांना सुरक्षित ठेवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *