छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स विकसित होण्याला मोठी संधी: महेश जाधव

उच्च तंत्रज्ञान आधारित स्टार्टअपला चालना देण्यासाठी विभागातील शैक्षणिक संस्थांच्या मदतीने तयार होणार रोडमॅप

छत्रपती संभाजीनगर,१३ मार्च  / प्रतिनिधी :-  गेल्या काही दशकांमध्ये औ्योगिक प्रगतीमध्ये मोठी झेप घेतलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या काही काळापासून उच्च तंत्रज्ञान आधारित नव उद्द्योग समोर येत असून, हायटेक स्टार्टअप्सना भविष्यात मोठी संधी असल्याचे मत ज्येष्ठ तज्ञ महेश जाधव यांनी व्यक्त केले.

देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरने मॅजिकच्या सहकार्याने सीएमआयए येथे मराठवाडा विभागातील उच्च तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात या विषयावर एका विशेष सत्राचे आयोजन केले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते.

चर्चासत्रदरम्यान महेश जाधव यांनी हायटेक स्टार्ट-अप कसे वाढवायचे याविषयी माहिती दिली. उच्च तंत्रज्ञान आधारित उत्पादन विकसित केल्यानंतर त्याचे यशस्वी उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक आव्हाने असतात, त्याच वेळेस अश्या नवउद्योगाला पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. शिक्षण, उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरने मोठी प्रगती केली असून, येथील भागधारकांनी एकत्रित पुढाकार आणि प्रयत्न केल्यास  क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध असे ते म्हणाले.
देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरचे संचालक सुरेश तोडकर यांनी उच्च तंत्रज्ञान आधारित स्टार्टअपला चालना देण्यासाठी विभागातील क्षेत्रातील तीन अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांच्या मदतीने रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

याप्रसंगी उद्योजक विवेक पवार यांनी हायटेक स्टार्टअप इकोसिस्टमचे हुबळी मॉडेल समजावून सांगितले आणि असाच पुढाकार छत्रपती संभाजीनगर येथेही घेतला जाऊ शकतो याबद्दल त्यांनी मत व्यक्त केले.

मॅजिकचे संचालक प्रशांत देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगताना शैक्षणिक संस्था, स्टार्टअप इनक्यूबेटर – मॅजिक, सीएफसी – इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर यांच्या मदतीने टॅलेंट पूल तयार करण्यासाठी मराठवाडा विभागातील सर्व स्तरातून प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. उद्योग, शेती, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रामध्ये उच्च तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स मोठे काम करू शकतात.  प्रश्नांची उकल करित असतानाच देशाच्या शाश्वत विकासामध्ये देखील हातभार लागेल.

या चर्चासत्राचे उद्घाटन सीएमआयएचे उपाध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी केले. मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी आभार मानले. या चर्चासत्रामध्ये उद्योजक, शैक्षणिक संस्था आणि विविध क्लस्टर्सचे प्रतिनिधी, स्टार्टअप्स यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.