अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची जिल्हाधिकारी पांडेय यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर,१३ मार्च  / प्रतिनिधी :-  एकीकडे खत,औषधे, बियाणे महागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला होता. यातच होतातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर, रत्नपुर, सिल्लोड सोयगाव, फुलंब्री, पैठण  आदी तालुक्यात पाहणी केल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.यावेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख भाऊ सांगळे , अशोक शिंदे, संजय निकम, डॉ. गोपालसिंह बचिरे, तालुकाप्रमुख संजय मोटे पाटील, दिनेश मुथा, मनोज पेरे, सोमिनाथ करपे,  रघुनाथ घरमोडे, दिलीप मचे आदींची उपस्थिती होती.

कृषीमंत्राच्या मतदारसंघात ४ आत्महत्या, राजीनामा द्या

 राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात चार आत्महत्या झाल्या, तर जिल्ह्यात आठवड्यात सात जणांनी जीवनयात्रा संपवली. दररोज शेतकरी आत्महत्या करतोय, कृषीमंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरकारने तातडीने आर्थिक मदत करून न्याय द्यावा. अशी मागणी केली.पीएम किसान योजनेचा हफ्ता पात्र शेतकऱ्यांना सुरू करावा. पिकासह जनावरे दगावली असून त्यांची भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.