पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, “काँग्रेस, माझी माझी कबर खोदण्याची स्वप्ने पाहण्यात मग्न”

यंदाच्या अर्थसंकल्पात, देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद

मांडा:– रविवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या वर्षातील त्यांचा हा सहावा राज्य दौरा आहे.

आज मंड्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यांनी बंगळुरू- म्हैसूर हायवेअंतर्गत १२,६०८ कोटींचे ६ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केले.

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही.आणि मी एक्सप्रेस वे बांधण्यात मग्न आहे,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.’

पुढे मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने देश लुटला’ पीएम मोदी पुढे म्हणतात, ‘२०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरीबाला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गरिबांच्या विकासासाठी असलेला हजारो कोटींचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दुःखाचा कधीच विचार नाही केला. उलट, शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करुन भाजप त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मांड्यातील २.५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पाठवण्यात आले आहेत,’ असेही मोदी यावेळी म्हणाले.

बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचेही राष्ट्रार्पण

म्हैसूर- कुशलनगर चौपदरी महामार्गाची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकातल्या मांड्या इथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण आणि म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गासाठीच्या पायाभरणीचा समावेश आहे.

यावेळी पंतप्रधानांनी सुरुवातीला भुवनेश्वरी देवी आणि आदिचुंचनगिरी आणि मेलुकोटच्या गुरुंना वंदन केले. कर्नाटकाच्या विविध भागातल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तसेच लोकांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेषतः मांड्याच्या लोकांनी त्यांचे ज्याप्रकारे प्रेमपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्यावर आशीर्वादाची बरसात केली, त्याबद्दल आभार व्यक्त केले. कर्नाटकातील लोकांकडून मिळणाऱ्या स्नेहाचा विशेष उल्लेख करत, पंतप्रधान म्हणाले की हे दुहेरी इंजिनचे सरकार, जलद गतीने विकासाचे प्रकल्प पुढे नेत समाजातील प्रत्येक नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम करत आहे.

आज लोकार्पण आणि पायाभरणी झालेले हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प देखील कर्नाटकच्याअ लोकांसाठी हे दुहेरी इंजिनचे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचाच भाग आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

बंगळुरू-म्हैसुरू द्रुतगती मार्गाविषयी देशभरात होत असलेली चर्चा लक्षात घेऊन घेऊन, पंतप्रधान म्हणाले की, देशातील तरुणांना अशा आधुनिक आणि उच्च दर्जाच्या द्रुतगती मार्गाविषयी अभिमान वाटतो. या द्रुतगती मार्गामुळे म्हैसूर आणि बेंगळुरू दरम्यानचा प्रवास निम्म्याने कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले. म्हैसूर-कुशलनगर या चौपदरी महामार्गाच्या पायाभरणीविषयी बोलतांना ते म्हणाले,  की या प्रकल्पांमुळे ‘सबका विकास’ची भावना प्रत्यक्षात येईल आणि सर्वांसाठी  समृद्धीचे दरवाजे खुले होतील. या सर्व प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी कर्नाटकातील जनतेचे अभिनंदन केले.

भारतातील पायाभूत सुविधा विकासाच्या संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी, या क्षेत्रातील दोन मान्यवर व्यक्तिमत्वाचे विशेष स्मरण केले. “ कृष्णराजा वडियार आणि सर एम विश्वेश्वरय्या, या कर्नाटकच्या भूमीच्या  दोन्ही सुपुत्रांनी देशाला नवी दृष्टी आणि सामर्थ्य दिले. या मान्यवरांनी संकटाचे संधीत रूपांतर केले आणि पायाभूत सुविधांचे महत्व समजून जाणले. त्यांच्या याच दूरदृष्टीची फळे आजच्या पिढीला मिळत आहेत.” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्याच पावलांवरुन मार्गक्रमण करत, आज देशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित केले जात आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“भारतमाला आणि सागरमाला सारख्या योजना आज भारत आणि कर्नाटकचे परिदृश्य बदलत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत असतानाच्या काळातच,  देशातील पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदीत अनेक पटींनी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटींहून अधिक निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पायाभूत सुविधांमुळे आयुष्यात सुलभता तर येतेच, त्याशिवाय   रोजगार, गुंतवणूक आणि उत्पन्नाच्या संधीही येतात, असे पंतप्रधान म्हणाले.  एकट्या कर्नाटकात सरकारने अलीकडच्या काळात महामार्गाशी संबंधित प्रकल्पांमध्ये 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील प्रमुख शहरे म्हणून बंगळुरू आणि म्हैसूरचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, की तंत्रज्ञान आणि परंपरा यांना जोडणाऱ्या या दोन  केंद्रांमधील दळणवळण व्यवस्था अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या दोन शहरांदरम्यान प्रवास करताना लोकांनी अनेकदा वाहतुक कोंडी होत असल्याची तक्रार केली आणि द्रुतगती मार्गामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ दीड तासांपर्यंत कमी होईल आणि या प्रदेशातील आर्थिक घडामोडीना  चालना मिळेल.

बंगळुरू- म्हैसूर महामार्ग रामनगर आणि मांड्या अशा दोन ऐतिहासिक वारसासंपन्न गावातून जातो, हे नमूद करत, पंतप्रधानांनी, असेही सांगितले की, या महामार्गामुळे पर्यटनाला चालना मिळेल, तसेच माता कावेरी यांच्या जन्मस्थळी जाणेही शक्य होईल.बेंगळुरू-मंगळुरु महामार्गावर पावसाळ्याच्या काळात कायम, दरडी कोसळण्याचा धोका होता, मात्र आता या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे, तो धोका उरणार नाही आणि  पावसाळ्यातही हा संपर्क तुटणार नाही, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यामुळे, बंदरांशीही संपर्क व्यवस्था चांगली होईल. संपर्क व्यवस्था वाढल्यामुळे ह्या भागातील उद्योगांनाही चालना मिळेल, असे मोदी म्हणाले.

या आधीच्या सरकारांच्या निष्काळजी दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी टीका केली. गरिबांच्या विकासासाठी वाटप करण्यात आलेला बराचसा पैसा लुटला गेला. 2014 मध्ये गरीब लोकांच्या वेदना समजून घेणारे संवेदनशील सरकार सत्तेवर आले, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने सातत्याने गरिबांची सेवा करण्यासाठी काम केले आहे आणि गृहनिर्माण, नळाने पाणीपुरवठा, उज्ज्वला गॅस कनेक्शन, वीज, रस्ते, रुग्णालये आणि वैद्यकीय उपचारांच्या खर्चाची गरिबांची चिंता कमी करणे यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे. गेल्या 9 वर्षात सरकारने गरिबांच्या दारात पोहोचून त्यांचे जीवनमान सुकर केले आहे आणि मोहिमेच्या स्वरुपात काम करून योजनांचे 100 टक्के लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगे काढण्यासाठी सरकारने स्वीकारलेल्या दृष्टीकोनावर भर देत पंतप्रधानांनी अशी माहिती दिली की गेल्या 9 वर्षात 3 कोटींपेक्षा जास्त घरे उभारण्यात आली आहेत, ज्यापैकी लाखो घरांची उभारणी कर्नाटकमध्ये झालेली आहे आणि 40 लाख नव्या घरांना जलजीवन मिशन अंतर्गत नळाने पाणीपुरवठा होत आहे.या वर्षीच्या अर्थसंकल्पात अप्पर भद्र प्रकल्पासाठी 5300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर अनेक दशकांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प देखील वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे या भागाला भेडसावत असलेल्या सिंचनाच्या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कर्नाटकच्या शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या लहान लहान मुद्यांच्या निराकरणाबरोबरच पंतप्रधानांनी माहिती दिली की सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून कर्नाटकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 12,000 कोटी रुपये जमा केले आहेत ज्यामध्ये एकट्या केंद्र सरकारने मंड्या भागातील 2.75 लाख शेतकऱ्यांना दिलेल्या 600 कोटी रुपयांचा समावेश आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या 6000 रुपयांच्या हप्त्यामध्ये आणखी 4000 रुपयांची भर घातल्याबद्दल पंतप्रधानांनी कर्नाटक सरकारची प्रशंसा केली. “ डबल इंजिन सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांना दुप्पट फायदे मिळत आहेत,” पंतप्रधान म्हणाले.   

पिकांच्या अनिश्चिततेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून येणाऱ्या रकमेची थकबाकी खूप जास्त काळ प्रलंबित राहिली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीमुळे या समस्येवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तोडगा निघू शकेल, असे ते म्हणाले. खूप मोठ्या प्रमाणात पीक आल्यास अतिरिक्त ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन घेता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक निश्चित उत्पन्न सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.  गेल्या वर्षी देशातील साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांना 20 हजार कोटी रुपयांच्या इथेनॉलची विक्री केली, ज्यामुळे या साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी वेळेवर चुकती करणे शक्य झाले, अशी माहिती त्यांनी दिली. 2013-14 पासून 70,000 कोटी रुपयांचे इथेनॉल साखर कारखान्यांकडून खरेदी करण्यात आले आहे आणि हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत, यामधल्या साखर सहकारी संस्थांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे सहाय्य आणि करामध्ये सवलत यांसारख्या तरतुदींचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

भारत हा विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असलेला देश आहे, त्यामुळे संपूर्ण जग आपल्या देशामध्ये स्वारस्य दाखवू लागले आहे. 2022 मध्ये भारताला विक्रमी परदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आणि यामध्ये कर्नाटक सर्वात मोठा लाभार्थी ठरला असून चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या राज्यात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. ही विक्रमी गुंतवणूक डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करत आहे, असे ते म्हणाले. आयटी व्यतिरिक्त पंतप्रधानांनी सांगितले की जैवतंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन यांसारखी क्षेत्रे अतिशय वेगाने विस्तारत आहेत तर एरोस्पेस आणि अंतराळ उद्योग यामध्ये देखील अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे.

एकीकडे डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे अभूतपूर्व विकास घडून येत असताना दुसरीकडे काही राजकीय पक्ष मोदींना नामशेष करण्याची  स्वप्ने पाहत आहेत, मात्र मोदी बंगळुरू म्हैसूर द्रुतगती मार्ग या विकास प्रकल्पामध्ये आणि लोकांचे जीवनमान सुकर करण्यामध्ये व्यग्र आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.  त्यांनी आपल्या विरोधकांना असा इशारा दिला की कोट्यवधी माता भगिनी आणि कन्या आणि भारताच्या जनतेचे आशीर्वाद हे त्यांच्या संरक्षणाची ढाल आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी कर्नाटकच्या जनतेचे आजच्या प्रकल्पांबद्दल अभिनंदन केले आणि ते म्हणाले कर्नाटकच्या गतिमान विकासासाठी डबल इंजिन सरकार अतिशय महत्वाचे आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी, केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी सुमालता अंबरीश आणि कर्नाटक सरकार मधील मंत्री यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

अतिशय जलद गतीने पायाभूत सुविधा प्रकल्पांचा होणारा विकास हा जागतिक दर्जाची दळणवळण व्यवस्था देशभरात निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा दाखला आहे. या प्रयत्नांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू म्हैसूरु द्रुतगती मार्गाचे आज लोकार्पण केले. या प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 275 च्या बंगळुरू नीदघाटा- मैसूरु सेक्शनच्या सहा पदरीकरणाचा समावेश आहे. 8480 कोटी रुपये खर्चाचा हा 118 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. यामुळे बंगळूरू आणि मैसुरू यामधील प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांवरून कमी होऊन 75 मिनिटांवर येणार आहे. या भागाच्या सामाजिक आर्थिक विकासाला गती देणारा कारक घटक म्हणून हा प्रकल्प काम करेल.

पंतप्रधानांनी मैसुरू-खुशालनगर या चार पदरी महामार्ग प्रकल्पाची देखील पायाभरणी केली. सुमारे 92 किलोमीटरवर पसरलेला हा प्रकल्प 4130 कोटी रुपये खर्चाने पूर्ण करण्यात येणार आहे आणि खुशालनगर ते बंगळूरुदरम्यानची दळणवळण व्यवस्था सुधारण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 5 तासांवरून 2.5 तासापर्यंत कमी होणार आहे.