‘परशुराम आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई,१० मार्च  /प्रतिनिधी :-ब्राम्हण समाजाच्या गरीब कुटुंबातील तरुणांना शैक्षणिक व व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य प्रकाश सोळंके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सावे म्हणाले, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘अमृत’ (ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टिंग अँड ट्रेनिंग) ही संस्था आहे. यामध्ये या तरुणांना संधी देण्यात येईल, असेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राम्हण समाजासाठी स्थापन करण्याची मागणी झाली. सुशिक्षित तरूणांना शासकीय नोकऱ्या मिळण्याची संधी कमी झाली आहे. तरूणांना व्यवसायाकडे वळल्याशिवाय पर्याय नाही. या महामंडळातून ब्राम्हण समाजातील लोकांना शैक्षणिक व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे. शासनाने हे अधिवेशन संपण्यापूर्वी महामंडळावर निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्षवेधीद्वारे केली.