वैजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने 62 हजार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ; दोन गायी ठार

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :- रविवारी पहाटे व सोमवारी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील बहुतांश मंडळात अवकाळी पावसाने सुसाट्याच्या वाऱ्यांसह हजेरी लावली‌. त्यामुळे काही भागात कापणीसाठी आलेला गहु, हरबरा, कांदा, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वैजापूर तालुक्यात दहा महसुली मंडळात सरासरी 10.7 मिमी पाऊस पडला असुन सर्वाधिक पाऊस नागमठाण मंडळात (20 मि.मी.) पडला आहे. त्यामुळे या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारज मंडळात (18 मि.मी.), महालगाव मंडळात (17 मिमी), खंडाळा मंडळात (16 मि.मी.), बोरसर मंडळात (15 मि.मी.), लोणी मंडळात (09 मि.मी.) व शिऊर मंडळात (02 मिमी ) पावसाची नोंद झाली आहे.

विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदेगाव येथे विष्णु पवार या शेतकऱ्याच्या दोन गायी वीज कोसळल्याने ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. झोलेगाव येथे ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील गव्हाचे उभे पीक अवकाळीच्या फटक्याने नष्ट झाले आहे. महसुल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यात 40 गावात सुमारे 62 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.