पालखेड येथील शेतकऱ्याचे सात लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीस ; चोरटा गजाआड

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी मधुकर वाणी यांचा सात लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली चार मार्चच्या रात्री शेतातुन चोरीस गेला होता. याप्रकरणी त्यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

याप्रकरणी पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (औरंगाबाद ग्रामीण) ज्ञानेश्वर रेंगे, उपनिरीक्षक रदीफ ठुबे, हेड कॉन्स्टेबल संजय घुगे, अशोक वाघ, शेख अख्तर, राहुल गायकवाड व ज्ञानेश्वर मेटे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. हा गुन्हा पालखेड येथीलच गणेश भगवान मुलमुले याने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चित्ते पिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथुन त्यास ताब्यात घेतले. त्याने इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन ट्रॅक्टर चोरल्याची कबुली पोलिसांना दिली असुन हा ट्रॅक्टर कंडारी (जि. जालना) येथे एका व्यक्तीकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी हे ट्रॅक्टर हस्तगत केले असुन आरोपीला पुढील तपासासाठी वैजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.