पाझर तलावासाठी शेतजमीन परस्पर संपादित केली – जमिनीसाठी शेतकऱ्याचे कुटुंबासह उपोषण

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :-तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन आपल्या नावावर असलेली डागपिंपळगाव (ता. वैजापूर) शिवारातील गट क्रमांक 169 मधील दहा आर (गुंठे) शेतजमीन परस्पर नावावर करुन पाझर तलावासाठी संपादित केली असा आरोप डागपिंपळगाव येथील दादासाहेब मधुकर माकुडे यांनी केला आहे. त्यांनी या जमीनीचा फेर तातडीने रद्द करावा या मागणीसाठी वैजापुरच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

शासनाने पाझर तलावासाठी तीन शेतकऱ्याच्या नावे असलेली एकुण 65 आर जमीन संपादित केली होती. यात भाऊसाहेब जगताप या व्यक्तीची 60 आर, भुषण जगताप यांची दोन आर व पुंजाहरी माकुडे यांची तीन आर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, भाऊसाहेब जगताप यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करुन दादासाहेब माकुडे यांच्या मालकीचे दहा आर क्षेत्र हे अतिक्रमण असल्याचे भासवून दिशाभुल केली व ही जमीन पाझर तलावाच्या संपादित क्षेत्रात सामील केली. वास्तविक, पाझर तलावात भाऊसाहेब जगताप यांची साठ आर जमीन गेलेली असतांना प्रत्यक्षात केवळ 50 आर जमीन गेल्याचे दाखवुन माझी दहा आर जमीन संपादित केली जे चुकीचे आहे. त्यामुळे हा फेर तातडीने रद्द करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दादासाहेब यांच्यासोबत मधुकर माकुडे, आप्पा माकुडे, पुजा माकुडे, राणी माकुडे, प्रसाद माकडे हे उपोषणास बसले आहेत.