निरस, बेरंग बजेट मांडून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे बजेटवर टीकास्त्र

मुंबई,९ मार्च  /प्रतिनिधी :-एकीकडे राज्यात मोठया प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातलेला असताना सत्ताधाऱ्यांनी निरस व बेरंग बजेट मांडून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केले. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंचसुत्रीवर आधारित अर्थसंकल्प सादर व्हायचा. सत्ताधाऱ्यांनी पंचामृत या नव्या नावाने अर्थसंकल्पाचे वर्णन केले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
पंचसूत्री होती त्याचेच नाव बदलून पंचामृत करण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना कुठेही यात दिलासा देण्यात आलेला नाही.
ज्या योजना अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना जाहीर केल्या होत्या त्याच योजना घोषणा पुन्हा करण्यात आल्या आहेत. विविध जाती-धर्मातील महान व्यक्तींच्या नावे महामंडळाची घोषणा करत सरकारने अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचे काम देखील केले आहे. या अर्थसंकल्पामध्ये फक्त जुमलेबाजी आहे, कुठेही महिला, शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न यात झालेला नाही.  निरस बेरंग बजेट या सरकारने मांडलं आहे.  जनतेशी कोणतंही देणं घेणं या सरकारला नाही. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना सरकारने मोठं मोठया घोषणांचा पाऊस पाडला आहे. आगामी निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन या घोषणांची सरबत्ती सरकारने केली मात्र त्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे पैसेच नाही, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.   निरस व बेरंग बजेट मांडून एकप्रकारे महाराष्ट्राची  दिशाभूल करण्याचा प्रयत्न या बजेटमधून झालेला दिसतो अशी प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.