ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातले बळ कमी होऊ देऊ नका- लता मुळे 

छत्रपती संभाजीनगर,९ मार्च  / प्रतिनिधी :-  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त चर्चासत्र आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

 कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त लता मुळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. लता काळे, आयुर्वेद महाविद्यालय शैक्षणिक प्रमुख डॉ.  जयश्री देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे आणि डॉ गणेश डोंगरे होते.

       लता मुळे यांनी आपल्या भाषणात उपस्थिताना मार्गदर्शन  करताना सांगितले की, स्त्रीशक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती बनवून दाखवा. आपले वाचन, लेखन इत्यादी छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा. आत्मनिर्भर बना. ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका. थोर स्त्रियांचे विचार, चारित्र्य सदैव स्मरणात ठेवा. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, माता रमाई, शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. महिलांचे हक्क, शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक महिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो.

   यावेळी डॉ. ज्योती मगरे आणि गुणवंत विद्यार्थी डॉ. यशश्री देशमुख, डॉ. पदमजा देशपांडे, अस्मिता शिंदे, झैदी सायेदा, गीतांजली भोसले, वर्षा नागरगोजे यांचा सत्कार  लता मुळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुछ आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पायल कमलानी आणि अन्सीका फरवानी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.