प्रा.डॉ.केशव सखाराम देशमुख हे एक महाराष्ट्रातील साहित्यामधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व- कुलगुरू डॉ. उद्धव भोसले 

नांदेड,९ मार्च / प्रतिनिधी :- कविवर्य प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख हे एक ग्रामीण साहित्यातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तिमत्त्वांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास १५ वर्षे अध्यापनाची सेवा दिली. ही बाब गौरवास्पद आहे. असे  गौरउद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. 

ते दि.८ मार्च रोजी प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंहबिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, सत्कारमूर्ती डॉ. केशव देशमुख, यांच्या पत्नी अल्काताई, त्यांचे वडील सखाराम, आई कोंडाबाई देशमुख यांची उपस्थिती होती. 

यावेळी कुलगुरूंनी प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांचा शाल, श्रीफळ,स्मृतीचिन्ह व आहेर देऊन सकुटुंब सत्कार केला.अध्यापनामध्ये एकूण ३५ वर्षे शैक्षणिक सेवेत असलेले प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी त्यापैकी २० वर्षे महाविद्यालयीन अध्यापन व १५ वर्षे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास अध्यापन, संशोधन, समीक्षा लेखन इत्यादीस सेवा दिली. 

विद्यापीठातील भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक असलेले प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ज्या कष्टातून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्या घामाचे दोन खांब येथे आहेत ते म्हणजे माझे आई-वडील या विद्यापीठांनी मला भरभरून दिले. सर्व मान-सन्मानाची पदे माझ्या पदरात टाकली. त्यामुळे मी या विद्यापीठाचा सदैव ऋणी राहील. महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे प्रवास म्हणजे नदीकडून समुद्राकडे झालेला प्रवास या समुद्रामध्ये मी माणुसकी जपली, या विद्यापीठांमध्ये अध्यापनासह मी माणसे जोडली मग त्यामध्ये विद्यार्थी असो, प्राध्यापक असो वा अधिकारी वर्ग असो मुळातच मी मातीतून आलेला असल्यामुळे मातीशी माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्यावर लिखाण करत गेलो, कविता लिहीत गेलो, संग्रह करीत गेलो, आणि यामध्येच कधी सेवानिवृत्त झालो हे मला कळालेच नाही. यापुढेही मी ग्रामीण साहित्यावर लिखाण करीत राहणार आहे. अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. 

विद्यापीठातील सर्व संकुलाचे संचालक व प्राध्यापकासह नांदेड शहरातून अनेक मान्यवरांनी या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थिती लावली. यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध कवियीत्री डॉ. वैशालीताई किन्हाळकर, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु  डोईफोडे, दै. उद्याचा मराठवाड्याचे संपादक राम शेवडीकर, प्रसिद्ध छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

यावेळी प्रा. मा.मा. देशमुख, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, सहा. कुलसचिव डॉ. डी.एम. तंगलवाड, गजानन इंगोले यांनीही प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. डी. एम. तंगलवाड यांनी केले.