खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

विधानसभा लक्षवेधी

मुंबई,८ मार्च  /प्रतिनिधी :- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते जालना हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय कुटे, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.

या प्रकल्पाबाबतचा विकास आराखडा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाने या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्यानंतर राज्याच्या हिस्स्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.