राज्यातील सर्व निवासी, वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,८ मार्च  /प्रतिनिधी :-राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून, त्या जागेचा एफएसआय मोजण्यात येणार नाही. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नवीन रस्ते बांधतांना नियमानुसार प्रत्येक ५० किमी अंतरावर शौचालय बांधण्यात येईल. तसेच महिला आयोग आणि महिलांशी संबंधित शासकीय कार्यालयांच्या इमारतींसाठी सुसज्ज जागा देण्याबरोबरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. मुंबईच्या दोन्ही फ्री वे वर महिला शौचालय बांधण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

विधानमंडळात महिलांसाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व सुविधा पुरविण्यात येतील. हा कक्ष याच अधिवेशन कालावधीत सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच मंत्रालयातदेखील विधिमंडळाच्या महिला सदस्यांसाठी एक विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व जिल्ह्यात महिला बचतगटांसाठी बाजार सुरू करण्यात येणार

— महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

एका वर्षाच्या आत राज्यातील सर्व जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी मोफत 15 दिवस जागा देवून बाजार सुरू करण्यात येणार आहे. तसेच सर्व सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून 50 टक्के रक्कम महिलांच्या सोयीसुविधांसाठी वापरण्यात येणार असून राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

राज्यात राबविण्यात येणाऱ्या महिला धोरणांची अंमलबजावणी करून त्याचा आढावा प्रत्येक वर्षी अधिवेशनात घेण्यात येणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. लवकरच महिला टुरिस्ट पॉलिसी राबविण्यात येणार आहे. आजच राज्यात 200 कोटी रुपयांच्या बीजभांडवल योजनेचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कंटेनर अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. तसेच चालते फिरते सुविधा केंद्र, महिला जीम, महिला अभ्यासिका, महिला स्किल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अशा अनेकविध योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री लोढा म्हणाले, महिलांच्या सर्व समस्या एकदाच सुटणार नाहीत. विधानसभेत सर्व महिला आणि पुरुष सदस्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. सभागृहात सर्व सूचनां विचारात घेतल्या  आहेत. यावर अधिवेशन कालावधीत महिला सदस्या तसेच विरोधी पक्ष नेते यांच्यासोबत सविस्तर बैठक घेवून सर्व सुचनांचा सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्यांच्या सुचनासांठी सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या सूचनांचा महिला धोरणात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने मंत्री श्री लोढा यांनी सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रस्तावावरील चर्चेत सदस्य यामिनी जाधव, सुलभा खोडके, माधुरी मिसाळ, सरोज आहिरे, गीता जैन, प्रतिभा धानोरकर, देवयानी फरांदे, सदस्य अबू आजमी, ऋतूजा लटके, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. भारती लव्हेकर, मंजूळा गावित, अदिती तटकरे, लता सोनवणे, प्रणिती शिंदे, मंदा म्हात्रे, वर्षा गायकवाड, मनीषा चौधरी, श्वेता महाले,सीमा हिरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, भास्कर जाधव, ज्ञानराज चौगुले, हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, आशिष शेलार, चेतन तुपे आदीनीं सहभाग घेतला.