नागालँड आणि मेघालयमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

नवी दिल्ली : नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नेफ्यु रियो आणि मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कॉनराड संगमा यांनी मंगळवारी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा उपस्थित होते.
 
नागालँड विधानसभा निवडणुकीत राज्यातील नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) आणि भाजप युतीने बहुमत मिळवले. एनडीपीपीने 40 आणि 20 जागांवर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत एनडीपीपी आणि भाजपने अनुक्रमे 25 आणि 12 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर नेफ्यु रियो यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. युतीचा भाग असलेल्या भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. भाजपचे यंथुंगो पॅटन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये प्रदेश भाजपचे अध्यक्ष तेमजेन इम्ना अलांग, जी काइतो आय, जेकब झिमोमी, केजी केन्ये, पी पाईवांग, मेस्तुबो जमीर, सीएल जॉन, एस. क्रूस आणि पी. बी. चांग यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली.

मेघालयमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

कोनराड संगमा यांनी दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आदी उपस्थित होते.राजधानी शिलाँगमध्ये कॉनरॅड संगमा यांच्या सरकारच्या शपथविधी समारंभात दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. प्रेस्टन टायन्सॉन्ग आणि स्नियावभालंग धर यांना मेघालयचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. अबू ताहिर मंडल, किरमेन शिला, मार्क्विस. एन. मारक आणि रखमा. ए. संगमा यांनी मेघालय सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच अलेक्झांडर लालू हेक, डॉ. एम. अम्पारीन लिंगडोह, पॉल लिंगडोह आणि कॉमिंगन याम्बोन, शक्लियर व्हर्जरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.