हवाईदल आणि नौदल प्रशिक्षण विमान – जहाज खरेदी करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली,​७​ मार्च / प्रतिनिधी:-संरक्षण मंत्रालयाने आज (7 मार्च 2023) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) या दोन कंपन्याशी अनुक्रमे 70 एचटीटी-40 बेसिक प्रशिक्षण  (मूलभूत प्रशिक्षण) विमाने आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या खरेदीसाठी करार केला. नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या तसेच करारांची देवाणघेवाण झाली. यावेळी संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी तसेच एचएएल आणि एल अँड टी चे प्रतिनिधी उपस्थित होते.

संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठी चालना देण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 मार्च 2023 रोजी एचएएल कडून 6,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 70 एचटीटी-40 बेसिक प्रशिक्षण विमानांच्या खरेदीला मान्यता दिली होती. बाय {इंडियन-आयडीडीएम (देशात रचना केलेले, विकसित आणि उत्पादित)} श्रेणी अंतर्गत 3,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या खरेदीसाठी एल अँड टी समवेत करार करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

एचटीटी-40 प्रशिक्षण विमान

कमी वेग उत्तम रीतीने हाताळू  शकण्यासाठी एचटीटी-40 या टर्बो प्रॉप विमानात विशेष सोय असून हे विमान प्रशिक्षण देताना उत्तम परिणामकारकता साधते. या पूर्णपणे एरोबॅटिक टँडम सीट टर्बो ट्रेनर विमानामध्ये वातानुकूलित कॉकपिट, आधुनिक एव्हीओनिक्स, हॉट री-फ्युएलिंग, रनिंग चेंज ओव्हर आणि झिरो-झिरो  इजेक्शन सीट आहेत.

नव्याने समाविष्ट झालेल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय हवाई दलात असलेली मूलभूत प्रशिक्षण विमानांची कमतरता हे विमान भरून काढते. खरेदीमध्ये सिम्युलेटरसह संबंधित उपकरणे आणि प्रशिक्षण सहायक सामग्रीचा समावेश असेल. हे विमान देशी बनावटीचे असल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ते अद्ययावत करता येण्याजोगे आहे. सहा वर्षांच्या कालावधीत या विमानांचा पुरवठा केला जाईल.

एचटीटी-40 मध्ये अंदाजे 56% स्वदेशी सामग्री वापरली आहे. मुख्य घटक आणि उपप्रणालींच्या स्वदेशीकरणाद्वारे उत्तरोत्तर हे प्रमाण 60% पर्यंत वाढेल. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासह (एमएसएमई) देशांतर्गत खाजगी उद्योगांना, एचएएल त्यांच्या पुरवठा साखळीत सहभागी करून घेईल. खरेदी प्रक्रियेत 100 पेक्षा जास्त एमएसएमईमध्ये समाविष्ट हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे.

कॅडेट प्रशिक्षण जहाजे

भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी ही जहाजे महिलांसह अधिकारी कॅडेट्सना त्यांच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर समुद्रात प्रशिक्षण देतील. राजनैतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हे जहाज मित्र  देशांतील कॅडेट्सना प्रशिक्षणही देईल. संकटग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी, शोध आणि बचावकार्य तसेच मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) मोहिमांसाठीदेखील ही जहाजे तैनात केली जाऊ शकतात. ही जहाजे 2026 पासून उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहे.

चेन्नईच्या कट्टुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्डमध्ये जहाजे  विकसित आणि उत्पादित केली जातील.  या प्रकल्पामुळे साडेचार वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख मनुष्यदिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे एमएसएमईसह भारतीय जहाजबांधणी आणि संबंधित उद्योगांमध्ये सक्रिय सहभागास प्रोत्साहन मिळेल.