..तर औरंगजेबाचे थडगे हैदराबादला हलवावी

आमदार संजय सिरसाट यांची एमआयएमच्या आंदोलनानंतर मागणी

छत्रपती संभाजीनगर,६ मार्च/प्रतिनिधीः- मुघल राजा औरंगजेब याचे येथील थडगे (ग्रेव्ह) हैदराबादला हलवण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे केली.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनने शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर संजय सिरसाट यांनी वरील उपरोधिक मागणी केली. औरंगाबादचे मूळ नावच ठेवण्यात यावे, अशीही आंदोलकांची मागणी आहे.औरंगजेबाची कबर काढून हैदराबादला ओवेसीच्या दारात करा. जेणेकरून त्याला रोज पहाता येईल, असे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी म्हटले, तर संजय शिरसाट यांनीही ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याचे म्हटले.

सिरसाट म्हणाले, “औरंगजेबाबद्दल जर त्यांना एवढेच प्रेम आहे तर त्याचे थडगे त्यांनी हैदराबादला हलवावे. तेथे त्यांना स्मारक बांधू द्या किंवा त्यांना जे करायचे आहे ते करू द्या, कोणाला काही त्रास होणार नाही, पण हे आंदोलन थांबवा.” संजय सिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटातील आहेत.

औरंगजेब आणि आमचा काही संबंध नाही. त्याच्याशी आम्हाला काही देण-घेणे नाही. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान काही लोकांनी औरंगजेबाचा फोटो उंचावत घोषणाबाजी केली होती यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

एमआयएमचे स्थानिक अध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी सिरसाट यांची मागणी म्हणजे फक्त राजकारण आणि आपले स्थान बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या समाजांत बेबनाव निर्माण करण्याच्या हेतूने आहे, असे म्हटले. औरंगजेबाबद्दल त्यांना जर एवढाच द्वेष आहे तर जी २० परिषदेच्या शिष्टमंडळाचा दौरा औरंगजेबाची पत्नी राबिया-ऊल- दौरानीचे थडगे, बिबी- का- मकबरा बघण्यास का काढण्यात आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. १६६८ मध्ये मकबरा औरंगजेबाचा मुलगा मुहम्मद आझम शाह याने बांधलेला आहे. भूतकाळातील राज्यकर्त्यांबद्दल इतका दीर्घ द्वेष असताना भाजप सरकार आपला महसूल वाढवण्यासाठी ताज महलचा (आग्रा) वापर का करते, असा प्रश्न नक्षबंदी यांनी विचारला.

भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांकडे लोकांचे कोणतेही प्रश्न नसल्यामुळे ते असे राजकारण करतात व समाजातील विविध घटकांमध्ये मतभेद निर्माण करतात, असे नक्षबंदी यांनी म्हटले. गेल्या महिन्यात राज्य सरकारचा औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला. संजय सिरसाट यांच्या मागणीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

एमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि मालेगावचेही नाव महान व्यक्तिंच्या सन्मानार्थ बदलण्यात यावे, अशी मागणी केली होती. जलील यांनी वरील शहरांच्या नामांतराची केलेली सूचना अशी- छत्रपती शिवाजी राजे महानगर (मुंबई), ज्योतिबा-सावित्री फुले नगर (पुणे), डॉ. बी. आर. आंबेडकर नगर (नागपूर), छत्रपती शाहू महाराज नगर (कोल्हापूर) आणि मौलाना आझाद नगर (मालेगाव).