छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश

छत्रपती संभाजीनगर– वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा ठराव कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते मंजुर करण्यात आला आहे. कार्यकारी परिषदेने सदरील महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देवून पुढील मान्यतेस्तव कृषी परिषदेस शिफारस केली असल्याचे कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

         छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी आ.सतीश चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खास बाब म्हणून छपत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कृषी महाविद्यालय सुरू केल्या जाईल अशी घोषणा सभागृहात केली होती.

16  फेब्रुवारी  रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आ.सतीश चव्हाण यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मणी व कार्यकारी परिषदचे सदस्य उपस्थित होते. कृषी विद्यापीठाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी व तंत्र विद्यालय, फळ संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यरत असून फळ संशोधन केंद्रांतर्गत 120 हेक्टर व कृषी तंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत 120 हेक्टर अशी एकूण 240 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. संबंधित कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र येथील शिक्षण व संशोधनासाठी लागणारी आवश्यक जमीन वगळून छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रस्तावीत महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करून सदरील ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.