छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस:आंबा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती

छत्रपती संभाजीनगर​,५ मार्च  / प्रतिनिधी :- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर,सोयगाव  आणि गंगापूर तालुक्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. सोयगाव तालुक्यात विजांचा गडगडाट झाला. वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली. रविवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने शेकडो आंबा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मोहोर व छोट्या आकारातील आंबा फळाची मोठ्या प्रमाणात गळ झाली. कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोह फुलाची गळ उशिरा सुरू झाली असताना बदललेल्या हवामानाने व पावसाने मोह फुलांना फटका बसणार आहे.

यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ५ ते ८ मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असून नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर​, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.