बारावीचा पेपर व्हॉट्सॲपवरुनच लीक:दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

बारावी पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक सत्य समोर

मुंबई: बारावी पेपर फुटी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. चक्क व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणा प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले गेले आहेत.

तब्बल ९९ जणांचा व्हॉट्सॅप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक, काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्ती होते. मात्र, पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा व्हॉट्सॅप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु असून डिलीट केलेला डेटा लवकरात लवकर रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीचं मुंबई कनेक्शन

बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून १७ मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे.