छत्रपती संभाजीनगरच्या जनमित्राचा केंद्र सरकारतर्फे सन्मान

दिल्लीतही लाईनमन दिवस उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर,५ मार्च  / प्रतिनिधी :- दिल्ली येथे शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने व टाटा पॉवर डीडीएलच्या सहकार्याने झालेल्या लाईनमन दिवस समारंभात महावितरणचे जनमित्र व अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.

ऊर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखालील केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद व टाटा पॉवर डीडीएलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गणेश श्रीनिवासन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. औरंगाबादमधील महावितरणच्या औरंगपुरा शाखेचे सहायक अभियंता सतीश अधाने व वरिष्ठ तंत्रज्ञ भगवान सहाणे, पुणे प्रादेशिक विभागातून सहायक अभियंता केदार कुलकर्णी, तंत्रज्ञ प्रदीप पवार, नागपूर प्रादेशिक विभागातून कनिष्ठ अभियंता अक्षय बनसोडे, प्रधान तंत्रज्ञ महेंद्र गोमासे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. ‘सेवा, सुरक्षा व स्वाभिमान’ अशी संकल्पना असलेल्या या समारंभात देशभरातील 20 हून अधिक राज्यांतील वीज वितरण कंपन्यांच्या निवडक 100 जनमित्रांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी वीज वितरण कंपन्यांतील अभियंते व जनमित्रांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. घराघरात प्रकाश पोचवणारे जनमित्र हे ख्ररे नायक असल्याचे उद्गार मान्यवरांनी काढले.