नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे  बेमुदत उपोषण सुरु 

छत्रपती संभाजीनगर,४ मार्च  / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला आज पासून सुरुवात झाली आहे. लोकशाही पध्दतीने आणि शांततेत होत असलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सर्व समाजातील नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यासह एमआयएम पक्षानेही आपला पाठिंबा दर्शवुन आंदोलनात सहभागी झाला आहे.

          आंदोलनात खासदार इम्तियाज जलील यांच्या सोबत एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. हा आंदोलन कोणत्याही जाती, धर्म, पक्ष, संघटनांचा नसून हा औरंगाबादकरांच्या अस्मियतेचा प्रश्न आहे. याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्ष व संघटनांनी करु नये तसेच शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनात कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होतील असे कृत्य न करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

          आंदोलनास वाढता पाठिंबा पाहता सहभागी होणारे विविध संघटना व पक्षाच्या नेत्यांनी कोणत्याही महापुरुषांबद्दल अपशब्द न वापरता अथवा कोणाचेही धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य न करता संयमाने व मुद्देसुद भाष्य करण्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

          आंदोलन लोकशाही मार्गाने, शांततेने आणि औरंगाबादकरांच्या सहकार्याने सुरु असल्याने सोशल मिडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणत्याही महापुरुषाबद्दल अपशब्द अथवा धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कोणत्याही प्रकारचे विधान किंवा मॅसेजेस पोस्ट न करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी युवकांना केले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाईक रॅली न काढण्याचे तसेच आंदोलन स्थळी कोणीही कोणत्याही पक्षाचे अथवा संघटनांचे झेंडे, फोटो किंवा बॅनर आणू नये असे सुध्दा आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. पुढे हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. केंद्रानेही परवानगी दिल्याने आता दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे.

जन्मलेल्या लोकांच्या भावना

खासदार इम्तियाज जलील पुढे म्हणाले, नामांतरामागे काहीतरी संबंध असायला हवा. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध होता? त्यांनी ना इथे जन्म घेतला ना त्यांचा इथे मृत्यू झाला होता. त्यांनी इथे काही कामे केली का? तर तसेही दिसत नाही. केवळ 30 वर्षांपूर्वी एका राजनैतिक पक्षाचा नेता या शहरात येतो आणि तो असे म्हणतो की मला या शहराचे नाव संभाजीनगर ठेवायचे आहे. त्याची भावना लक्षात घेऊन जर आपण हा निर्णय घेत असू तर मी तर लोकांनी निवडून दिलेला खासदार आहे. मला भावना नाही का? औरंगाबाद शहरात जन्म घेतलेल्या या लोकांना भावना नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.

औरंगजेबाला मानत नाही

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत आहे म्हणजे औरंगजेबाला मानतो असे नाही. असेही खासदार जलील म्हणाले. औरंगजेब हे राजे होते. त्यांची आम्ही कधीही जयंती-पुण्यतिथी केली आहे का? असेही ते म्हणाले.

इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध दर्शवत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. या दरम्यान ते म्हणाले, पोलिसांना आणि प्रशासनाला आमचे आवाहन आहे की, आमचे हे लोकशाही पद्धतीने आणि शांततेत आंदोलन असणार आहे. यापूर्वी देखील आम्ही औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती बनवली होती. त्याच कृती समितीच्या अंर्तगत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ज्या पक्ष आणि संघटनांना आमच्यासोबत यायचे आहे. त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला तसे कळवावे.