देशपांडेंवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून, पोलिसांना संशय कुणावर?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन ते गौप्यस्फोट करणार होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला नेमका का झाला आणि कुणी केला? याबाबत स्पष्टता नसली तरी हल्ल्यामागचे एक कारण चर्चिले जात आहे. शिवाय हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

हिंदूजा रुग्णलयातील उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी प्रथमदर्शनी हा हल्ला राजकीय वैमनस्यातून केल्याची माहिती समोर आली आहे. काही राजकीय नेत्यांची नावं घेत देशपांडेंवर हल्ला झाला. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांनी राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केल्याचे समजते. परंतू या हल्ल्याचे पडसाद अधिवेशनात उमटल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुप्तता पाळली असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

संदीप देशपांडे यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत थेट वरूण सरदेसाई यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी. संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. आजच्या भ्याड हल्ल्याचे उत्तर नक्की मिळेल. पाठीमागून हल्ले करायचे नाहीत. मर्द असाल तर पुढे या. संदीप देशपांडे सतत मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यांच्यावर हल्ले होत असतील तर आम्ही गप्प बसायचे का?” असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.