पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार – सहकार मंत्री अतुल सावे

विधानसभा लक्षवेधी

मुंबई,३ मार्च  /प्रतिनिधी :-गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणारी नवीन समिती येत्या १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील पतसंस्थांमध्ये झालेले गैरव्यवहार आणि अन्य कारणांमुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येणाऱ्या अडचणी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

            सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले की, राज्यातील पतसंस्थांसाठी असणाऱ्या विविध मानकांचे नियमितपणे देखरेख करण्यासाठी वार्षिक आणि मासिक माहिती व्यवस्थापन प्रणाली सहकार आयुक्तांच्या 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतूदींनुसार स्थिरीकरण व तरलता निधी 11 सप्टेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेन्वये स्थापन करण्यात आला आहे. या निधीसाठी नियामक मंडळाने ठरविलेल्या दराने व पध्दतीने पतसंस्थांनी अंशदान द्यावयाचे आहे. सद्यस्थितीत हा दर 10 पैसे प्रति 100 रुपये ठेव असा आहे. नियामक मंडळाने 50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतची योजना प्रस्तावित केली असून सदर योजनेबाबत राज्यातील सर्व पतसंस्था, फेडरेशनचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी केलेल्या सूचना, हरकती विचारात घेऊन योजनेस अंतिम स्वरुप देण्याबाबत नियामक मंडळाच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. श्वानांचे संगोपन करण्यासाठी राज्यात श्वान दत्तक योजना सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सर्वश्री प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, प्राणी प्रेमी किंवा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दत्तक योजनेच्या माध्यमातून श्वान दत्तक दिले जाईल. याबाबत विहीत धोरण ठरविण्यासाठी एक समिती गठित करण्यात येईल. समितीत या विषयाबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग करून घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.