हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला प्रतिबंधासाठी विशेष भरारी पथक – मंत्री शंभूराज देसाई

विधानपरिषद लक्षवेधी

मुंबई,२ मार्च  /प्रतिनिधी :-हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळात विशेष भरारी पथक नेमून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध देशी, विदेशी मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक अनुषंगाने लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, अवैध देशी, विदेशी मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीला आळा घालण्यासाठी विभागामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. अधिवेशनानंतर या विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीविरुद्ध बंधपत्र घेतले जाते, परंतु तिसऱ्यांदा जर या बंधपत्राचे संबंधित व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई निश्चित करण्यात येईल. तसेच गृह विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 375 गुन्हे नोंदविण्यात येऊन 349 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश अधीक्षक यांना देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विभाग स्तरावर भरती प्रक्रिया राबवून तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, भाई जगताप, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.