वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक

मुंबई :-अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

चोर मचाये शोर अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्‍या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा, घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो, शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

————————–

दरवाढीचा निषेध-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपये दरवाढ झाली आहे. हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेलो तरी पैसे अधिक द्यावे लागतील. मध्यवर्गीय महिला, खेड्यातील जनता, आदिवासी, गोरगरिबांसाठी ५० रुपये वाढ खूप होते. या दरवाढीचा निषेध महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तसेच एमएसईबीच्या वीज जोडण्या आहेत ते तोडण्याचे काम अव्याहतपणाने हे सरकार करत आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या दोन्ही गोष्टींवर आवाज उठवण्याचे काम महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे, असेही जयंतराव पाटील म्हणाले.

गॅस दरवाढ व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याबाबत आज सभागृहात आवाज उठवण्यात येईल. देशात जी महागाई वाढत आहे त्याबाबत सभागृहात भूमिका मांडणार आहोत. त्याचबरोबर कांदा विक्रीसाठी राज्य सरकार समिती नेमणार आहे. मागील १४ दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. समिती नेमून सर्व कांदा विकल्यानंतर सरकार निर्णय देणार हे आम्हाला मान्य नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चितच सभागृहात विरोधी पक्षाकडून आवाज उठवण्यात येईल, अशी माहिती जयंतराव पाटील यांनी दिली.