वैजापूर बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही – प्रवाशांची गैरसोय

वैजापूर ,​१ मार्च​ ​​​​/ प्रतिनिधी :- वैजापूर बसस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे.याकडे एस.टी.महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू होण्यापुर्वी राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक होते.परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना पाणी मिळत नाही.बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ही परीस्थीती अनेक दिवसांपासून सुरू आहे. बसस्थानकात असलेले दुकानदार जादा दराने पाणी विकत असल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.बसस्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो नागरिक शासकीय कामासाठी व बाजारा करीता शहरात येतात.प्रवाशामध्ये विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांची संख्या मोठी आहे.यामुळे बसस्थानक परिसरात दिवसभर गर्दी असते.परंतु पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पैसे खर्च करून आपली तहान भागवावी लागते.पाण्या बरोबरच येथे फॅनची देखील सुविधा नाही.काही फॅन बंद असल्याने उकाडा निर्माण होत आहे.शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे.मात्र तेथे पैसे मोजावे लागतात.तेथेही पाण्याची व स्वच्छतेची वानवा असल्याने दुर्गंधी पसरली आहे.पिण्याच्या पाण्यासाठी  व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र पाणी नसल्यामुळे ती व्यवस्था धुळखात पडून आहे.या जागेचा वापर नागरीक थुंकण्यासाठी करत आहे.बसस्थानकात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.