उद्धव गटाच्या आमदारांना विरोधकांच्या बाकावर दिली जागा

मुंबई,२७ फेब्रुवारी/प्रतिनिधीः राज्याच्या विधानसभेत सोमवारी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १४ आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांच्या सदस्यांसह विरोधकांसाठीच्या बाकावर बसले.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवार हा पहिला दिवस होता. या १४ आमदारांच्या बैठक व्यवस्थेवरून संभाव्य वाद टाळण्यासाठी सरकारने त्यांना विरोधकांसाठीची जागा दिली.
शिवसेनेचे (उबाठा) सभागृहातील गटनेते अजय चौधरी आणि आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आमदारांच्या पुढील जागा दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १० दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून दिल्यानंतरची ही घडामोड आहे. गेल्या आठवड्यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाच्या दप्तरानुसार फक्त एकच शिवसेना आहे, असे म्हटल्यानंतर शिवसेनेच्या (उबाठा) आमदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती.

शिवसेनेने (उबाठा) नार्वेकर यांना शिवसेनेने विधिमंडळाच्या तिसऱ्या मजल्यावरील पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला कार्यालय दिले जावे, असे आवाहन केलेले आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) आमदार विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या विधानभवनच्या तळमजल्यावरील कार्यालयाचा वापर करीत  आहेत.