वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई,२७ फेब्रुवारी /प्रतिनिधी :- विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम्‌  व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी ११.५५ वा. कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह सन्माननीय मंत्री, विधानसभा सदस्य उपस्थित होते.

राज्यपालांना विधानभवन येथे मानवंदना

image.png

राज्यपाल रमेश बैस यांचे विधानमंडळ येथे आगमनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले.

त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्याच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

विधानसभेचे माजी आणि निकटच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावाला सभागृहाने संमती दिली. या सर्व माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृह अतीव दुःख व्यक्त करित आहे, अशा भावना अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडतांना व्यक्त केल्या.

लक्ष्मण पांडुरंग जगताप, विद्यमान विधानसभा सदस्य,  मोरेश्वर विठ्ठलराव टेमुर्डे, माजी विधानसभा उपाध्यक्ष, केशवराव शंकरराव धोंडगे, माजी लोकसभा सदस्य व माजी वि.स.स., डॉ.देवीसिंह रामसिंह शेखावत, सदाशिवराव शंकरराव माळी, उत्तमराव केशवराव पटवारी-भालेराव यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली.सर्वश्री सदस्य योगेश सागर, संजय शिरसाट, सुनिल भुसारा,सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.