मंत्रिमंडळ बैठक: राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा

मुंबई,२६ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या सुधारणा 2025-26 पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2022 पासून होणार आहे. मदतीचे सुधारित दर पुढील प्रमाणे (कंसात जुने दर) :

मृतांच्या कुटुंबियांना – 4 लाख रुपये (बदल नाही). चाळीस ते ६० टक्के अपंगत्व आल्यास – ७४ हजार रुपये ( ५९ हजार १००). साठ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास – २.५० लाख रुपये (२ लाख).

जखमी व्यक्ती इस्पितळात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी – १६ हजार रुपये (१२ हजार ७००), एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी – ५ हजार ४०० ( ४ हजार ३००).

दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र/घर पाण्यात बुडालेले असल्यास/घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास/ पूर्णत: क्षतीग्रस्त झाल्यास प्रति कुटुंब – २ हजार ५०० (बदल नाही). सामानाच्या नुकसानीकरिता प्रति कुटूंब – २ हजार ५०० (बदल नाही).
पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी सखल भागात– १ लाख २० हजार रुपये ( ९५ हजार १००). दुर्गम भागातील घरांसाठी – १ लाख ३० हजार (१ लाख १ हजार ९००)
अंशत: पडझड पक्क्या घरांसाठी – ६ हजार ५०० (५ हजार २००).
अंशत: पडझड कच्च्या घरांसाठी – ४ हजार रुपये (३ हजार २००).
झोपडीसाठी – ८ हजार रुपये (४ हजार १००).

मृत दुधाळ जनावरांसाठी – ३७ हजार ५०० ( ३० हजार), ओढकाम जनावरांसाठी – ३२ हजार रुपये (२५ हजार). वासरू, गाढव, खेचर आदीसाठी – २० हजार रुपये (१६ हजार रुपये). मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी – ४ हजार रुपये (३ हजार). कुक्कूट पालन – १०० रुपये प्रति कोंबडी, दहा हजार रुपयांपर्यंत (५० रुपये प्रति कोंबडी, ५ हजार रुपयांपर्यंत).

शेती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – ८ हजार ५०० रुपये, २ हेक्टर मर्यादेत (६ हजार ८००). आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी – १७ हजार रुपये प्रति हेक्टरी (१३ हजार ५००). बहुवार्षिक पिकांसाठी – २२ हजार ५०० रुपये (१८ हजार).

शेतजमीनीच्या नुकसानीसाठी – १८ हजार रुपये प्रति हेक्टरी (१२ हजार २०० रुपये). दरड कोसळून किंवा जमीन खरडून झालेल्या नुकसानीसाठी – ४७ हजार रुपये, प्रति हेक्टरी. (३७ हजार ५००)

मत्स्य व्यवसाय – बोटींच्या अंशतः दुरूस्तीसाठी – ६ हजार रुपये (४ हजार १००). अंशतः बाधित जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी – ३ हजार रुपये ( २ हजार १००). पूर्णतः नष्ट बोटीकरिता – १५ हजार रुपये (९ हजार ६००). पूर्णतः नष्ट जाळ्यांसाठी – ४ हजार रुपये (२ हजार ६०० रुपये).

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता

विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ झाल्यामुळे जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.जळगाव येथे ६५० खाटांचे रुग्णालय व १५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे.