चोरट्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या  सराईत चोरट्यासह दोघांना गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने शुक्रवारी दि.२४ रात्री अटक केली. चोरट्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी शनिवारी दि.२५ दिले.

राजेंद्र ऊर्फ बाबासाहेब राऊत ऊर्फ राजू बाबुराव मुचकुले (२६, रा. साईनगर, परतुर जि. जालना), ओम फकीरा पवार (२०, रा. परतुर गांव ता. परतुर जि. जालना) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 या  प्रकरणात शहानुरवाडी परिसरातील मयुरबन कॉलनीत राहणारे संदीप  लक्ष्‍मण भारंबे (४७) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. फिर्यादी हे वाळुज येथील एका कंपनीत काम करतात. २२ जानेवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्‍या सुमारास फिर्यादीची पत्‍नी एका सत्‍संगाला, मुलगी क्लासला तर मुलगी शाळेत गेला होता. त्‍यामुळे फिर्यादी हे घराला कुलूप लावून कंपनीत गेले. संधी साधत चोरट्यांनी त्‍यांच्‍या घरोच कुलूप तोडून कपाटातील पॅन्‍टमध्‍ये ठेवलेले ४२ हजार ५०० रुपये आणि कपाटातील लॉकर मध्‍ये ठेवलेले १२ हजार ५०० रुपये असे सुमारे ५५ हजार रुपये चोरले. दुपारी साडेचार वाजेच्‍या सुमारास फिर्यादीचा मुलगा घरी आला तेंव्‍हा घरात चोरी झाल्याचीबाब समोर आली. या प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍हे शाखेने तपास करुन आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी राजेंद्र ऊर्फ राजन राऊत हा सराईत गुन्‍हेगार असुन त्‍याच्‍याविरोधात पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि औरंगाबाद शहरात एकूण २६ गुन्‍हे दाखल आहेत. त्‍याने साथीदार ओम पवार आणि १६ वर्षीय मुलाच्‍या साथीने दुचाकीवर छत्रपती संभाजीनगर शहरात जवाहरनगर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत तीन तर पुंडलिकनगर, क्रांतीचौक आणि छावणी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत प्रत्‍येकी एक गुन्‍हा केल्याचे तपासा दरम्यान सांगितले.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भाग्यश्री डागळे/संचेती यांनी आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी व गुन्‍ह्यात चोरलेली रक्कम जप्‍त करायची आहे. विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेत गुन्‍ह्याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.