मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

मुंबई,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मराठी भाषा विभागातर्फे  २७ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,  मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (दिनांक २७ फेब्रुवारी) हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.

मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान” मुंबई येथे सायं. ५ वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मराठी भाषेचा प्रवास उलगडून दाखविणारा सांगितिक कार्यक्रम “ऐसी अक्षरे रसिके” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ व भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना  दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

तसेच, यावर्षी विविध महानगरपालिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाचन प्रेरणा दिन मराठी स्पर्धेतील तीन विजेत्या महानगरपालिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ३५ पुस्तकांचे प्रकाशन या वेळी होणार आहे.