वैजापूर नगरपालिकेचा 2023-24 चा 34 कोटी रुपये शिलकीचा वार्षिक अर्थसंकल्प

भुयारी गटार योजनेसाठी 25 कोटी रुपये

शहर सफाई कंत्राटसाठी 3 कोटींची तरतूद

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर नगरपालिकेचा सन 2023-24 चा 34 कोटी 82 लाख 90 हजार 837 रुपये शिलकीचा वार्षिक अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर करण्यात आला. 

पालिकेच्या फुले-आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन हा अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला. उपनगराध्यक्ष साबेरखान अमजदखान, पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांच्यासह सर्व नगरसेवक बैठकीस उपस्थित होते.

अंदाजपत्रकानुसार पालिकेला विविध कर व इतर बाबीतून मिळणारे उत्पन्न ( महसुली कर) 44 कोटी 63 लाख 50 हजार 148 रुपये अपेक्षित असून 46 कोटी 89 लाख 81 हजार 214 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. भांडवली जमा 1अब्ज 5 कोटी 15 लाख 50 हजार 148 रुपये अपेक्षित असून खर्च 1अब्ज 07 कोटी 75 लाख 82 हजार 214 रुपये अपेक्षित आहे. अशाप्रकारे एकूण महसुली व भांडवली जमा 1 अब्ज 89 कोटी 48 लाख 54 हजार 265 रुपये तर खर्च 1 अब्ज 54 कोटी 65 लाख 63 हजार 428 रुपये अपेक्षित आहे. अखेरची शिल्लक 34 कोटी 82 लाख 90 हजार 837 रुपये दाखविण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पात महसुली उत्पनातून रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी 60 लाख, गटार व नाल्यांसाठी 5 लाख, वृक्षसंवर्धनासाठी 5 लाख, रस्ते दुरुस्तीसाठी 10 लाख, सांस्कृतिक कार्यक्रम (वैजापूर फेस्टिव्हल) 5 लाख, पुतळ्यांचे संवर्धन 50 लाख, शहर सफाई कंत्राटसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर भांडवली जमा रकमेतून व्यापारी संकुल बांधण्यासाठी 50 लाख रुपये, गटार व नाल्यांसाठी 15 लाख रुपये, भुयारी गटार योजनेसाठी 25 कोटी रुपये, घनकचरा प्रकल्प 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार …

अर्थसंकल्पाच्या बैठकीनंतर पालिकेतील पदोन्नती झालेल्या मंगेश नाईकवाडी, राहूल मापारी, मिलिंद साळवे, जयपाल राजपूत, अरुण कुलकर्णी, संतोष रत्नपारखी, मोकळे या कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.