वैजापूरचे तहसीलदार गायकवाड यांच्यावर जेसीबी टाकून जीवघेणा हल्ला करणारा वाळू माफिया राहुल मुळे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- 

तालुक्यातील शिवना वाळू पट्टयात आंतक निर्माण करणाऱ्या कुख्यात वाळू तस्कराला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाइल सापळा रचून पुण्यातून अटक केली. शिवना नदी पात्राचा ‘डॉन’ समजल्या जाणाऱ्या या वाळू माफियाने वर्षभरापूर्वी चक्क वैजापूरच्या तहसीलदारावर जेसीबी यंत्र घालून  जीवे मारण्याचा  प्रयत्न केला होता. या घटनेनंतर फरार झालेला हा आरोपी कन्नड,वैजापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर होता.

राहुल ऊर्फ रामा ऊर्फ रामनाथ नवनाथ मुळे ( वय 35 वर्ष, रा. देवळी ता. कन्नड) असे पोलिसांनी पकडलेल्या वाळू माफियाचे नाव आहे. तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी विरुद्ध शिवुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते.घटनेची गंबीरता लक्षात घेत तत्कालीन जिल्हाअधिकारी सुनील चव्हाण यांनी आरोपी मुळेविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती ( व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 चे कलम 3 (1) अन्वये स्थानबद्धतेचे आदेश 8 सप्टेंबर 2022 रोजी जारी केले होता. तेव्हापासून रामा मुळे हा पोलिसांना चकमा देत होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना रामा पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी लपुन बसलेल्या ठिकाणी साफळा रचुन त्याला पुण्यात बेड्या ठोकल्या पोलिस निरीक्षक रामेश्वर रेगे, उपनिरीक्षक विजय जाधव, पो.हे.कॉ लहू थोटे, पोलिस नाईक दीपक सुरोशे, पो.कॉ. ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपी रामा मुळे याची हर्सल कारागृहात रवानगी केली आहे. 

तहसीलदार सोबत ‘पंगा’ महागात ….

शिवना नदीपात्रात रामा मुळे यांचे साम्राज्य होते.त्यांच्या मर्जीनुसार कोणी वाळूच्या कनाला सुद्धा हात लावण्याची हिम्मत करत नसे. महसूल व पोलिसांची सुद्धा या ठिकाणी  दाळ शिजत नव्हती त्यामुळे तो कन्नड व वैजापूर हद्दित विना टेंडर वाळूचा अवैध उपसा तो खुलेआम करायचा.मात्र तहसीलदार गायकवाड यांच्या सोबत त्याने नदी पात्रात ‘पंगा’ घेतला नेमके तिथुनच मुळे मागे महसूल व पोलिसांची ससेमारी लागली. यादरम्यान त्याला ‘डील’ देणाऱ्या शिवुर पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाची उचलबांगडी प्रशासनाला करावी लागली होती.