पहाटेच्या शपथविधीमुळेच ठाकरे मुख्यमंत्री – शरद पवार

पुणे,२२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-  काही दिवसांपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आला. याचे कारण म्हणजे जयंत पाटील यांनी ‘पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते’ असं विधान केले होते. त्यानंतर सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवारांना माहिती होती,’ असे धक्कादायक विधान केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीचा जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठे विधान केले आहे.

बुधवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पहाटेच्या शपथविधीवर टिप्पणी केली होती. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, ”भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा आमचा एक प्रयत्न झाला. त्यातून राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली हा एक फायदा झाला. जर राज्यात तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपती राजवट उठली नसती तर पुढचे सरकार बनले नसते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले नसते,’ असे पवारांनी म्हटले आहे. तसेच या शपथविधीबद्दल आपल्याला माहिती होती का असे विचारले असता ”यावर अधिक स्पष्ट बोलण्याची आवश्यकता नाही. जर राष्ट्रपती राजवट उठलीच नसती तर ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते,’ हे मान्य करत पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यांना अप्रत्यक्षपणे मूकसंमती दिली आहे.पहिल्यांदाच त्यांनी अशाप्रकारचे विधान केल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत आहेत.” मात्र, आता त्यांच्या या नव्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.