पवारांच्या विधानावर फडणवीसांची गुगली ; राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली : फडणवीस

मुंबई ,२२ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-२३ नोव्हेंबर २०१९ मध्ये राजभवनात झालेला आमचा शपथविधी शरद पवारांच्या पाठिंब्यानेच झाला होता असा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावर निरुत्तर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांनी अखेरीस यावर आपले मौन सोडले आहे. जर तत्कालीन स्थितीत राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते या शरद पवारांच्या विधानावर फडणवीसांनी गुगली टाकली असून राष्ट्रपती राजवट का लागली ? कुणाच्या सांगण्यावरून लागली हे देखील पवारांनी स्पष्ट करावे, असे म्हणत पवारांनाच क्लिनबोल्ड केले आहे.

पवारांनी केलेल्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी आणि एकंदर विषयावर खुलासा केला ही चांगलीच गोष्ट आहे. आता माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की महाराष्ट्रात तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपती राजवट का लागली ? कुणामुळे लागली ? याचाही खुलासा पवारांनी जर केला तर मी शपथविधीबाबत केलेल्या विधानाच्या कड्या जोडल्या जातील, सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि याची उत्तरेही पवारांनीच द्यावीत अशी माझी अपेक्षा आहे,’ असे म्हणत फडणवीसांनी पवारांच्या विधानावर गुगली टाकत त्रिफळा उडवला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस ?

पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात राजकीय समीकरणे, महाविकास आघाडीची स्थापना आणि तत्कालीन परिस्थितीत घडलेल्या घटनांची पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक दावे केले होते. ”अजित पवारांसोबत पहाटे झालेला शपथविधी हा थेट शरद पवारांच्या सहमतीनेच झाला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची बोलणी झाल्यावर, कुणाला कुठली मंत्रीपदे द्यायची हे ठरल्यावर आणि जिल्ह्याची पालकमंत्रीपदे निश्चित झाल्यावरच तो शपथविधी झाला होता असा आरोप करतात फडणवीसांनी शरद पवारांच्या एकूण विश्वासार्हतेवरच भलंमोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच मी जे बोलत आहे ते वास्तवाच्या फक्त ५० टक्के आहे, जेव्हा अजित पवार यावर आपलं मौन सोडतील तेव्हा मी उर्वरित ५० टक्के सत्य कथन करेल,’ असा इशाराही फडणवीस यांनी बोलताना दिला होता.