माझ्या पतीला गुंड ठरवणारे संजय राऊत कोण?-राजा ठाकूर यांच्या पत्नीची पोलिसांत मानहानीची तक्रार दाखल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे. ही सुपारी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला देण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर आता राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

माझ्या पतीला गुंड ठरवणारे संजय राऊत कोण? असे म्हणत पूजा ठाकूर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केले, त्याविरोधात मी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे, असे पूजा ठाकूर यांनी सांगितले. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा हटवली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्या हत्येची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे, असे राऊत यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

राजा ठाकूर यांचा गुंड असा उल्लेख संजय राऊत यांनी केला. त्यानंतर राजा ठाकूर यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. राऊत यांच्या या विधानाची दखल घेऊन त्याचा तपास करावा. तसेच राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पूजा ठाकूर यांनी पोलिसांकडे केली आहे.

पूजा ठाकूर प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाल्या, माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांनी प्रुफ आणावा मग बोलावे. कलम २११, १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मी याआधी शिवसेनेकडून निवडणूक लढले आहे. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यांनी मला उमेदवारी दिली होती. आता मी शिंदे गटात आहे, असे त्यांना वाटत आहे.

पूजा ठाकूर म्हणाल्या, याआधी शिवसेनेकडून निवडणूक लढले तेव्हा माझे पती समाजसेवक म्हणून त्यांना चालत होते. आत त्यांना ते गुंड दिसत आहेत. मी अजूनही शिवसेनेत आहे. माझे पती मला समाजकार्यात मदत करत असतात. हीच आमची ओळख आहे. या गोष्टीचा पाठपुरावा करत राहून न्यायाची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे पूजा ठाकूर यांनी म्हटले.