वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई नाही ;अतिवृष्टीचे अनुदान कागदावरच ..?

वैजापूर ,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील 82 हजार 262 हेक्टरवरील उभे पिकांची माती झाली.त्यामुळे स्वतः कृषि मंत्री, स्थानिक सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन पाहणी केली, फोटो सेशन केले. कागद रंगवले तातडीने नुकसान भरपाईपोटी 111 कोटी 87 लाख 63 हजार रुपयांचा अहवालही शासनाला पाठवले, प्रशासनाकडून पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे आश्वासनही देण्यात आले होते.  मात्र, पाच महीने उलटूनही कोटीचे “अनुदान” कागदावरच व शेतकऱ्यांचे खाते रिकामेच आहे.विशेष म्हणजे अनुदान कुठे अडकले,कधी मिळणार याविषयी कोणीही बोलायला तयार नाही 

सप्टेबर महिन्यात तालुक्यातील अनेक भागात सातत्याने अतिवृष्टी झाली होती. तसेच अनेक महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नसली तरी सातत्याने पाऊस झाला होता. प्रारंभी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरूच होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन पाहणी केली.तसेच 

सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश महसूल व कृषी विभागास दिल्याने दिवाळी अखेरपर्यंत सर्व पंचनामे तसेच बाधित क्षेत्राचे अवलोकन करून तालुका प्रशासनाने 111 कोटी 87 लाख 63 हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली होती.दरम्यान,या सर्व प्रक्रिया होऊन आता पाच महीने उलटले मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही.शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहे.