पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन निकाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 

मुंबई,
राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल असे  उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
 
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सेमिस्टर परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल. परीक्षा घेण्याबद्दल कुलगुरुंची मते जाणून घेतली. सध्याच्या परिस्थितीत तातडीने परीक्षा घेणे शक्य नाही. आमच्यातला पालक आजही जिवंत आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याऐवजी आतापर्यंत झालेल्या सेमिस्टरमधील सरासरीच्या आधारावर पास करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
 
कुठल्याही परिस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना असे वाटते की, आपण जास्त मार्क मिळवू शकतो, त्यांच्यासाठी योग्य वेळी परिक्षा घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शाळा नव्हे शिक्षण कधी सुरु करायचा हा मुद्दा आहे. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येईल असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *