केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह फुटाळा तलावाच्या ‘फाऊंटन शो ‘ चा आनंद घेतला

नागपूर ,१८ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

 श्री. शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी यावेळी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे, प्रा.आगलावे, विलास गजघाटे, भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री पावणेआठ वाजता आगमन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर फुटाळा तलाव येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

गृहमंत्री अमित शहा विशेष विमानाने गुवाहाटीवरून नागपूरला पोहोचले. पुढील तीन दिवस ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. आज रात्री त्यांचा नागपूर येथे मुक्काम असून उद्या सकाळी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रेशीम बागेतील स्मृती भवन येथे ते भेट देणार आहेत. त्यानंतर लोकमत वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत.

आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, टेकचंद सावरकर,कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, माजी खासदार विजय दर्डा, डॉ.विकास महात्मे,अजय संचेती, माजी आमदार परिणय फुके, अरविंद गजभिये, अर्चना डेहनकर, राजू पोतदार, मलिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर त्यांनी फुटाळा तलावावरील जगप्रसिद्ध ‘लाईट अॅन्ड फाऊटन शो ‘चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आनंद घेतला. त्यांच्यासाठी आज हा विशेष ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता.