अंगणवाडी सेविकांचा 20 फेब्रुवारीपासून संप

वैजापूर ,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- अंगणवाडी सेविकांना पुर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा द्यावा, वेतनश्रेणी मिळावी या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस येत्या 20 फेब्रुवारीपासुन बेमुदत संपावर जाणार आहेत. संप काळात अंगणवाडी सेविका काळ्या फिती लावुन काम करणार आहेत.

तीन ते सहा वयोगटातील चिमुकले पोषण आहारापासून वंचित राहु नयेत म्हणुन गरम ताजा पोषण आहार वाटप करण्यात येऊन अंगणवाडी बंद करण्यात येईल व आहार वाटपाची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यात येईल. फेब्रुवारी महिन्यानंतरचे अहवाल व माहिती ऑनलाईन पद्धतीने भरणार नाही असे निवेदन अंगणवाडी सेविकांतर्फे पंचायत समितीतील प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिक्षक आमदार कपिल पाटील व प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले असुन या आंदोलनात बोरसर, पालखेड, गाढेपिंपळगाव, लाडगाव व महालगाव या बीटमधील अंगणवाडी कर्मचारी काळ्या फिती लावुन सहभागी होणार आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, सचिव कमल येवले, तालुकाध्यक्ष पुष्पा जाधव, अश्विनी सोनवणे, कविता चौधरी, आशा हारदे, मुक्ता मनाळ, गितांजली पहाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.