‘जागर लोक कलेचा ‘ या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव-ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ.मु.शिंदे

वेरूळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पूर्वरंग’ कार्यक्रमाची सुरूवात

औरंगाबाद,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  वेरुळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘जागर लोक कलेचा’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे महोत्सवाचे वातावरण तर निर्माण होतेच शिवाय स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना देखील वाव मिळत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मु.‍शिंदे म्हणाले.

वेरूळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पूर्वरंग’ कार्यक्रमाची सुरूवात झाली. यातीलच ‘जागर लोक कलेचा’ हा कार्यक्रम आज क्रांती चौकात मोठ्या जल्लोषात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ.मु शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रारंभी झांशी राणी पुतळ्याला पुष्प हार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने ‘जागर लोक कलेचा’ हा कार्यक्रम सुरू झाला.

क्रांती चौक येथील झांशी राणी पुतळा परिसरात बुधवारची सायंकाळ लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या भारुड, गोंधळ आणि पोवाड्याने रंगतदार झाली आणि वातावरण भारुन गेले. निरंजन भाकरे यांच्या भारुड संचाने कार्यक्रमाला आरंभ केला. त्यानंतर शाहीर प्रा. अजिंक्य लिंगायत यांच्या पोवड्यांनी वातावरणात वीर रस भरला आणि उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. शेवटी सुमित धुमाळ यांच्या गोंधळाने कार्यक्रम टिपेला गेला. रंगतदार पेहरावतील गोंधळी आणि भक्तिपूर्ण आळवणी ने गोंधळ उत्तरोत्तर रंगत गेला.

यावेळी डॉ. श्रीमंत हारकर ( उपसंचालक पर्यटन विभाग) , विजय जाधव ( सह संचालक पर्यटन विभाग) , दीपक हरणे ( प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी) , तसेच आयोजन समिती सदस्य अनिल इरावणे, डॉ. ऋषिकेश कांबळे, कुंडलिक अतकरे, आदींची उपस्थिती होती.

औरंगाबादच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान असणारा ‘वेरुळ – अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव’ 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान सोनेरी महल येथे होणार आहे. तीन दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे कला, वादन, गायनाची, कथ्थकची सुरेख मैफल असणार आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.