पाच वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या दांम्पत्याचा संसार औरंगाबाद खंडपीठाने जुळवला

औरंगाबाद,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या दांम्पत्याचा संसार औरंगाबाद खंडपीठाने जुळवून आणला. विशेष म्हणजे न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्या्यमूर्ती आर.एम. जोशी यांनी विभक्त दांम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांना चेंबरमध्ये बोलवून सुनावणी घेत हा वाद मिटवला आणि दांम्पत्याचा संसार  पुन्हा जुळल्याने पतीसह नातेवाईकांवर दाखल केलेला गुन्हादेखील खंडपीठाने रद्द केला.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ३७ वर्षीय महिलेचा विवाह बालेपीर (जि. बीड) येथील व्यक्तीशी २३ जानेवारी २००६ रोजी झाला होता. या दाम्पत्यास दोन मुलीं (१७ वर्षे आणि १५ वर्षे) आहेत़. मात्र क्षुल्लक कारणांवरून दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाल्याने २०१८ पासून पीडित महिला  मुलींसह पतीपासून विभक्त राहत होती. वाद वाढत गेल्याने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पीडित महिलेने पतीसह सासु-सासरे, दीर, नणंद आणि नंदोई यांच्याविरुध्द पाथरी पो​लि​स  ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हां दाखल करण्यात आला. दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी पीडितेच्या पती व त्यांच्या नातेवाईकांनी ॲड. सईद एस. शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली.

या ​प्रकरणाच्या सुनावणीवेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकीलांना आपापसात तडजोड करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत, कोर्ट हॉलऐवजी त्यांच्या चेंबरमध्ये सुनावणी घेतली. न्यायमुर्तीनी गैरसमज दूर करून दोन्ही मुलींच्या भविष्यासाठी पुन्हा एकत्र येण्याबाबत समजावून सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. सईद शेख यांनी तर पीडित महिलेच्याा वतीने ॲड. तबरेज कादरी आणि शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ए.आर. काळे यांनी काम पाहिले.