जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे; ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे पर्याय वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

मुंबई, दि. 31 : जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे, तिथे त्या पद्धतीने का होईना, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र पुढील काळात विभागाची  स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले. सद्य:स्थितीत गुगल क्लासरूमचा वापर सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांच्यासमवेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच  शिक्षण क्षेत्रातील इतर तज्ज्ञही उपस्थित होते.

गेल्या 10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले. तसेच ते सोडविण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले.

शिक्षण हे जीवनावश्यक

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, येत्या जूनपासून शिक्षण सुरू झाले पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन, प्रिलोडेड टॅब अशा सर्व पद्धतीने शक्य आहे, त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ नये. दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात.  ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अडचणीचे आहे, त्या ठिकाणी इतर पर्यायांचा वापर करुन शिक्षण सुरू करावे. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करतांना कोरोना बाधित रुग्णाना क्वारंटाईन करण्यासाठी ज्या शाळा ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल. 

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष देण्याचे मान्य करुन,  शिक्षकांना शिक्षणाशिवाय इतर कामे दिली जाऊ नये यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

शाळांसाठीएसओपीतयार करणार – प्रा.वर्षा गायकवाड

राज्यातील इतर भागात शैक्षणिक सत्र 15 जून, तर विदर्भात 26 जून पासून सुरु होते. राज्यातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु रहावे, यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी मान्यवर शिक्षण तज्ज्ञ, अधिकारी, पालक यांच्या सूचनांच्या आधारावर शाळांसाठी नियमावली (‘एस ओ पी’) तयार करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच टिव्ही, रेडिओच्या माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याची तयारी झालेली आहे. यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘गली गली सिम सिम’ हा कार्यक्रम दररोज सकाळी 10 वाजता प्रक्षेपित होतो. अभ्यासक्रमासाठी लागणारे पाठ्यपुस्तके प्रत्येक शाळेपर्यंत येत्या 15 जून पर्यंत पोहोचविण्याचे नियोजन झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास प्राधान्य – राज्यमंत्री बच्चू कडू

शालेय सत्र सुरू करतांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे असलेल्या इंटरनेट, मोबाईल यासारख्या सुविधांच्या उपलब्धतेनुसार त्यांचे वर्गीकरण करुन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊन आणि शिक्षकांना यासंबंधिचे प्रशिक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.  

विभागाचा आराखडा तयार

गुगल क्लासरूम ही सेवा गुगल तर्फे शालेय शिक्षण विभागाला मोफत पुरविण्यास तयार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिली. दीक्षा या केंद्र शासनाने उपलब्ध करुन  दिलेल्या ॲपवर महाराष्ट्राने तयार केलेल्या ई साहित्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्यासाठीचा आराखडा विभागाकडे तयार आहे. यात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सणांच्या सुट्ट्या कमी कराव्यात. तसेच येणारे शैक्षणिक सत्र मे पर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कोरोनामुळेच नव्हे तर बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. मात्र हे करत असतांना विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची तयारी करुन घेणे आवश्यक आहे, अशा सूचना डॉ.माशेलकर यांनी यावेळी दिल्या. टिव्ही रेडिओ सोबतच टोल फ्री क्रमांक देऊन टेलिफोन या माध्यमाचाही शिक्षण पद्धतीमध्ये समावेश करण्याबाबत त्यांनी सुचविले.

ऑनलाईन तसेच नव्या माध्यमांचा वापर करतांना शिक्षकांचे काम वाढणार आहे शिक्षकांना तेव्हा  बदलणाऱ्या माध्यमांना हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे. शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची पदे भरण्यात यावीत, अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांना पुन्हा शिक्षणाच्या कामासाठी नेमावे, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली.विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी डॉ.अनिल पाटील, लातूरचे प्रा.अनिरुद्ध जाधव, नागपूरचे रविंद्र फडणवीस, औरंगाबादचे रजनीकांत गरुड, विवेक सावंत, वसंत घुईकेडकर आदिंनी या बैठकीत आपल्या सूचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *