दारुच्या दुकानाचा वाद पेटला! राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची  मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीका 

अजित पवारांच्या आरोपांवर शिंदे गटाच्या मंत्र्याचा जबरदस्त पलटवार

औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  दारुच्या दुकानाचा वाद चांगलाच पेटला आहे.  पैठणच्या सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. दारूची दुकान असणारा नेता काय लोकांचं भलं करेल असा सवाल त्यांनी विचारत अक्षरशः भुमरे यांची खिल्ली उडवली. बिडकीनमधल्या वाईनशॉप समोरच्या स्पीडब्रेकरवरुन अजित पवारांनी भुमरेंना टोला लगावला होता. त्याला आता संदीपान भूमरेंनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार औरंगाबाद  दौ-यावर होते. या दौ-या दरम्यान अजित पवारांनी पैठण आणि वैजापूर येथील शेतकरी मेळाव्याला उपस्थिती  लावली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील मंत्र्यांवर सडकून टीका केली. तीन तीन मंत्रिपदं मिळूनही मराठवाड्याचा विकास होत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

दारुच्या दुकानांबाबत नेमकं काय म्हणाले होतो अजित पवार?

यावेळी घेतलेल्या सभेत ‘ये दारू,पी दारू’ असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये  भुमरेंना फटकारलं होत. अजितदादांनी भुमरे यांनी दारूची दुकानं उघडली, असं म्हणत जोरदार टीका केली. भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केल्याचं आरोप अजित पवार यांनी केला. गिऱ्हाईकांचे लक्ष जावे म्हणून या दारुच्या दुकानांसमोर स्पीडब्रेकर लावल्याचा आरोपही अजित पवारांनी केला. 

अजित पवारांकडेच दारुचे कारखाने आहेत; संदीपान भूमरेंचा पलटवार

अजित पवारांकडेच दारुचे कारखाने असल्याचा पलटवार मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे.  अजित पवारांनी विचार करून बोलावं असं भुमरेंनी म्हंटल आहे. त्याचबरोबर रेडा हा शब्द अजित पवारांच्या तोंडून शोभत नाही. याच रेड्यानं तुम्हाला घरी बसवलं असं भुमरे यांनी म्हंटले. दरम्यान आम्हाला गद्दार म्हणण्याचा अजित पवारांना अधिकार नाही. भल्या पहाटे तर त्यांनीच गद्दारी करून शपथ घेतली होती असा टोलाही भुमरेंनी अजित पवारांना लगावला आहे.