आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा होणार:राज्य सरकार सहआयोजक होण्यास तयार 

नवी दिल्ली,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी:-आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार सहआयोजक होत असल्यास परवानगी देता येईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव विकास खारगे यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या महासंचालक व्ही. विद्यावती यांना राज्य सरकार सहआयोजक होण्यास तयार असल्याचे कळविले आहे.  

औरंगाबाद येथील देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात आयोजित केला आहे. त्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणशी परवानगीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यांनी परवानगी नाकारल्यानंतर देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने पुरातत्व सर्वेक्षणला विचारणा केली होती. नियमावली बघता महाराष्ट्र सरकार देवगिरी प्रतिष्ठानसोबत सहआयोजक असल्यास परवानगी देण्याचा विचार करू, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने न्यायालयात सांगितले. त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राज्य सरकारकडे सहआयोजक होण्याबाबत पाठपुरावा केला. राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी राज्य सरकार सहआयोजक होण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या महासंचालक व्ही. विद्यावती यांना पत्र पाठविण्यात आले. शिवजयंती उत्सवात राज्य सरकार सहआयोजक आहे. १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी किल्ल्यात कार्यक्रम सादर करण्यास परवानगी द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर दोन दिवसात पुरातत्व सर्वेक्षण अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.