वैजापुरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आज मेळावा 

वैजापूर ,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शनिवारी वैजापूर शहरात आगमन होत आहे.‌ तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दुपारी एक वाजता आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होत असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राहणार आहेत.

याशिवाय कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड, पक्ष निरीक्षक अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष मनोज घोडके, जेष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, माजी आमदार किशोर पाटील, अण्णासाहेब माने, महिला आघाडीच्या छाया जंगले, अल्पसंख्यांक आघाडीचे कदिर मौलाना, सुधाकर सोनवणे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, हरिभाऊ लघाने, रंगनाथ काळे, संजय जाधव, संतोष कोल्हे या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

राष्ट्रवादी संवाद यात्रेच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते पंकज ठोंबरे यांनी तालुकाध्यक्ष ॲड. प्रताप बोराडे, एल.एम. पवार, अमृत शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघातील जवळपास शंभर गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला आहे. राष्ट्रवादीची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आयोजित या संवाद दौऱ्यास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने अजितदादांच्या दौऱ्याबाबत सर्वांना प्रचंड उत्सुकता असल्याचे पंकज ठोंबरे यांनी सांगितले. या शेतकरी मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंकज ठोंबरे व तालुकाध्यक्ष ॲड. प्रताप निंबाळकर यांनी केले आहे.