माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २ :- ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार, माजी आमदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनानं ग्रामीण विकासाचा ध्यास असलेलं, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेलं, शेती, सहकाराच्या क्षेत्रातलं तज्ज्ञ, मार्गदर्शक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही राज्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, दहेगावच्या सरपंचपदापासून खासदारकीपर्यंतचा रामकृष्ण बाबा पाटील साहेबांचा प्रवास हा अपार कष्ट, जनसेवेच्या तळमळीचा प्रवास आहे. शेती व सहकाराच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीणविकासावर भर दिला. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी काम केलं. त्यांचं जीवन राजकीय, सामाजिक, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

रामकृष्णबाबा पाटील यांच्या निधनामुळे एक सर्वमान्य नेतृत्व हरपले : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

राज्यातील ज्येष्ठ नेते व औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या निधनामुळे ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले एक सर्वमान्य नेतृत्व हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

रामकृष्णबाबा पाटील यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ते एक अतिशय लोकप्रिय व समाजाच्या सर्वच घटकांमध्ये स्वीकारार्हता असलेले नेते होते. सरपंच पदापासून आमदार व खासदारकीपर्यंतच्या प्रवासातून त्यांची कर्तबगारी व लोकप्रियता स्पष्ट होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच रूपात काँग्रेसला दीर्घकाळानंतर यश मिळाले होते. राजकीय क्षेत्रासह सामाजिक व सहकार क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले. शेती आणि अध्यात्माकडे त्यांचा ओढा होता. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक अनुभवी मार्गदर्शक हरपल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनाने अनुभवी व निष्ठावान नेतृत्व गमावले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनाने अनुभवी व निष्ठावान नेतृत्व गमावले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनामुळे एक अनुभवी व निष्ठावान नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

रामकृष्ण बाबा पाटील यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक, आमदार, खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मिळालेल्या पदांचा वापर त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला. समाजकारणासोबतच शेती, सहकार आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. रामकृष्ण बाबा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *